
पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; 'या' नावांची जोरदार चर्चा
पुणे : पुणे शहराचा महापाैर ६ फेब्रुवारीला निवडला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्तांनी ६ फेब्रुवारीचा मुहुर्त काढला आहे. या दिवशी पुण्याची दहावी महिला महापाैर काेण हे स्पष्ट हाेईल. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेचे आयोजन करणे, तसेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेण्याबाबत तारीख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चितीसाठी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवार (दि. ६) ही तारिख निश्चित करण्यात आलेली आहे.
ही पहिली विशेष सभा शुक्रवार सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासक तथा महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजप ठरल्याने महापालिकेत त्यांची सत्ता स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. त्यांच्याच पक्षाचा महापौर, उपमहापौर होणार असल्याने या पदांवर वर्णी लागावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
महापौर निवडीच्या दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा होऊन पुण्याला नवीन महापौर मिळणार आहे. शहराचे ५८ वे महापौर म्हणून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेचे महापौर पद यावेळी सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाची विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नगरसचिव कार्यालय महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. महापौर, उपमहापौरांची निवड झाल्यानंतर महापालिकेचे सभागृह अस्तित्वात येते.
यापुर्वी या महिला झाल्या महापाैर
पुणे महापालिकेच्या पहिल्या महापाैर म्हणून १९९२ साली काँग्रेस पक्षाच्या कमल व्यवहारे यांना मान मिळाला. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दिप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, मुक्ता टिळक यांनी महिला महापौर म्हणून काम पाहिले आहे.
भाजपमध्ये तीव्र स्पर्धा
यावेळी पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. आता पुण्याला दहावी महिला महापौर मिळणार हे निश्चित झाले आहे. या पदासाठी भाजपच्या अनेक प्रमुख महिला नगरसेवकांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, स्वरदा बापट, निवेदिता एकबाेटे आदींची नावे पुढे येत आहेत. अगदी यावेळी प्रथमच निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या समर्थकांनीही समाजमाध्यमांवर पाेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार नाव जाहीर
अशी होते महापौर निवड
महापालिकेने पाठविलेल्या पत्रावर विभागीय आयुक्त महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. त्यानंतर महापालिकेची विशेष सभा कधी होईल याची माहिती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. विशेष सभेची नोटीस काढली जाते. दरम्यानच्या काळात महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज स्वीकृती केली जाईल. महापौरपदाची निवडणूक होणार त्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर संबधित उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. यामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल असल्यास पिठासीन अधिकारी महापौर, उपमहापौर पदासाठी मतदान
घेतात. त्यानंतर पिठासीन अधिकारी महापौरपदी निवडून आलेल्या व्यक्तीची घोषणा करतात.