संग्रहित फोटो
भोर : महाड-भोर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेला वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटातील कॉंक्रिटीकरणाचे काम आणि पावसाळ्यापूर्वीची सुरक्षितता लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.
वरंधा घाटातील २१ किलोमीटर अंतराच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर हिर्डोशी ते वरंधा (किमी ७०/९०० ते ९२/००३) दरम्यान रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांचा आहे. एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे बॅकवॉटर आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने पर्यायी जागा उपलब्ध नाही. याशिवाय या मार्गावरील काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून आहे. त्याच्या मंजुरीसाठी वनविभागाचे नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. येणारा पावसाळा लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून जेणेकरून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कमी करता येईल.
याबाबत भोरचे उपविभागीय अधिकारी यांनी पोलिस, तहसीलदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी वरंधा घाटातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्चपासून ते 30 एप्रिलपर्यंत हा मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
काही गावांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध
घाट पूर्णपणे बंद असला तरी स्थानिक गावांतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष तरतूद करण्यात आली आहे. धामणदेव, कारुंगण, हिर्डोशी, सोमजाई माळ, वारखंड, शिरगाव, उंबर्डेवाडी, शिळीम आदी गावांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध केला असुन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना आपत्कालीन स्थितीत परवानगी दिली जाईल.
महाड-पुणे, महाड-कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग
महाडहून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव – निजामपूर – ताम्हिणी घाट – मुळशी – पिरंगुट – पुणे कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा -पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सुरुर – सातारा – कराड-कोल्हापूर अथवा राजेवाडी फाटा – पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड – कोल्हापूर.






