सौजन्य - नवराष्ट्र टीम
पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या प्रणिती शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मोहन जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहराध्यक्ष दिप्ती चवधरी, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यामांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपा महायुती सरकार करत आहे. कोणाचीही मागणी नसताना ८० हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे, तर दुसरीकडे ३६ हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च केले जात आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्यावेत, संपूर्ण कर्जमाफी करावी, चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात, पिण्याच्या पाण्याचे मायक्रो नियोजन करावे. शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांना गावातच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण भागातील स्थलांतर रोखले पाहिजे पण सरकार यातील काहीच करताना दिसत नाही. दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे पण सरकार फक्त वल्गना करत आहे, त्यांना दुष्काळाचे गांभिर्यच नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे.
देवेंद्र फडणवीस झाडखाऊ मुख्यमंत्री
महाराष्ट्रात विकास प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. कर्जतमधील भीमाशंकरच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. साताऱ्यातही असाच एक प्रकल्प प्रस्तावित आहे. वाढवण बंदर प्रकल्पही स्थानिकांना उद्ध्वस्थ करणारा व पर्यावरणाला मोठा धोका आहे. पर्यावरणाचे भिषण संकट उभे ठाकले आहे. या सर्व प्रकल्पासाठी होत असलेली वृक्षतोड पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इतिहासात झाडखाऊ म्हणून नोंद होईल, असे सपकाळ म्हणाले.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे पण सध्याची चौकशी अत्यंत संथगतीने होत आहे. सरकारचा अहवालही दिशाभूल करणारा आहे. या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी न्यायाधिशाच्या देखरेखीखाली करावी व जनतेच्या मनातील शंका दूर करावी, असे सपकाळ म्हणाले.
डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी
डिलिमिटेशन विधेयक हे राष्ट्रविरोधी आहे म्हणून काँग्रेस पक्षाने त्याला विरोध केलेला आहे. आमदार, खासदारांची संख्या वाढवून चालणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वाढवले पाहिजेत. पण भाजपाला मात्र सत्तेचे केंद्रीकरण करायचे आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून विविध आमिषं दाखवली जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत. वाट्टेले ते करुन हे विधेयक मंजूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी यासंदर्भात सवन्वय साधत असून घटक पक्षही या विधेयकाला विरोध करतील अशी अपेक्षा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Ans: महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत असताना अमित शाह यांनी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.
Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, चारा छावण्या सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.
Ans: उत्तर : अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करून जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.






