संग्रहित फोटो
या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, व्यंकटेश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर आरोपी धिरज साकल, सागर केसरे आणि जगदीश यादव अशी पसार आरोपींची नावे असून पोलिस त्यांचा कसुन शोध घेत आहेत. छावणी ठाण्याचे अंमलदार दिपक भागवत सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
४ ऑक्टोबरच्या रात्री ९ ते ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत अंमलदार दीपक सोनवणे यांची होमगार्ड मुळे यांच्यासोबत ११२ मोबाइलवर पेट्रोलिंग ड्युटी होती. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून केशर मॉल, नेहरू चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडण सुरू असल्याचा कॉल मिळाला. सोनवणे आणि मुळे तातडीने तेथे पोहोचले. तेथे सुमारे ६० ते ७० मुले जमलेली होती. एक ट्रक (एमएच-१६-डीएल-५२८५) उभा होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशाची अंदाजे १० ते १२ जनावरे असल्याचे आढळले. ट्रकची चावी कोणीतरी काढून घेतली होती, तर चालक तेथेच उभा होता. सोनवणे यांनी ट्रकची चावी मागून तो पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र, नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धिरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा यांनी विरोध केला. तुम्ही त्यांना सोडून कसे देता? असे म्हणत त्यांनी सोनवणे यांच्याशी हुज्जत घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ट्रक अडविल्याने दिला चोप
परिस्थिती चिघळत असल्याने सोनवणे यांनी नाईट राऊंडचे ड्युटी अधिकारी उपनिरीक्षक सुरेश माळी यांना बोलावले. त्यांच्यासोबत ११२ मार्शलवरील अंमलदार समीर शेख व जमील शेखही तेथे पोहचले. ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यासाठी सोनवणे यांनी होमगार्ड मुळे यांना ट्रकमध्ये बसविले. याचवेळी नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धिरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा यांनी सोनवणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दगडाचा घाव; डोक्यातून वाहिल्या रक्ताच्या धारा
मारहाणीच्या वेळी ओमकार ऊर्फ चिन्ना भंडारी याने तेथे पडलेला दगड उचलून सोनवणे यांच्या डोक्यात मारला. दगडाच्या घावाने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांचा शर्ट आणि पँट रक्ताने माखली. जखमी झाल्यानंतर सोनवणे यांनी हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी व्हॉलीबॉल मैदानाच्या बाजूने धाव घेतली. मात्र, वरिल आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली.
हे सुद्धा वाचा : …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
हल्लेखोरांच्या तावडीतून कसेबसे सुटल्यानंतर सोनवणे यांनी छावणी पोलिस ठाणे गाठले, सरकारी कर्तव्य पार पाडत असलेल्या अंमलदारावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिस दलातही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करित आहेत.






