
पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
बसथांब्यातील लोखंडी बैठक व्यवस्था जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी त्याच्या पट्ट्या निघाल्या आहेत. वारंवार गंज चढत असल्याने विद्यार्थी, लहानमुले, महिला, जेष्ठ नागरिक यांना बसथांब्यामध्ये बसायला जागाच नाही. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात व पावसात बसची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागत आहे. प्रशासनाकडून योग्य दखल वेळेत घेतली नाही. तातडीने बसथांब्याचे नूतनीकरण केले नाही तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन केले जाईल. व होणाऱ्या नुकसानीस प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सुहास निम्हण यांनी दिला आहे. या वेळी अशोक मराठे, संदीप काळे, पांडुरंग सुतार, विजय ढाकणे, नंदन काळे, शिवम दळवी, किरण काकडे, महादेव मोरे, किशोर इंगवले हे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसाखाली पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती बसस्थानकाचा ज्या धर्तीवर अत्यंत आधुनिक, देखणा, हायटेक आणि सर्वसुविधांयुक्त कायापालट केला आहे. ते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वास्तू आहे. दादांच्या याच दूरदृष्टीचा आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून पौड येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करणे सहज शक्य आहे, असे निम्हण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.