
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
पुणे/आकाश ढुमे पाटील : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. आता हे वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर असताना, महायुतीतील भाजपकडूनही बँकेच्या सत्तेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी बँकेवरील पकड कायम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील या निवडणुकीकडे राजकीयदृष्ट्याही लक्ष लागले आहे.
बँकेच्या संचालक मंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून स्थान कायम ठेवणाऱ्या आजी-माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांकडून पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, रेवणनाथ दारवटकर, आप्पासाहेब जगदाळे आणि दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचे बँकेच्या राजकारणात दीर्घकाळापासून स्थान आहे. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबाचाही बँकेच्या संचालक मंडळाशी संबंध राहिला आहे.
इंदापुरातील समीकरणांकडे लक्ष
इंदापूर तालुक्यात कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे सेवा सोसायट्यांवर प्रभावाचे राजकारण आहे. त्यामुळे भरणे किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातून आप्पासाहेब जगदाळे यांचेही संचालकपद राहिले आहे. त्यामुळे दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे बिनविरोध ठेवण्यासाठी प्रयत्न होणार का, याकडे लक्ष लागले आहे. इंदापूरच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांचीही या निवडणुकीवर छाप पडण्याची शक्यता आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उपस्थिती लावली होती. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये सहकार्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही या समीकरणांचा प्रभाव पडतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता
बँकेच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मात्र पुरंदर, भोर, जुन्नर आणि खेड तालुक्यांतील राजकीय समीकरणे वेगळी असल्याने या भागातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि भाजप समर्थकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही चर्चेत आहे.
जिल्ह्याच्या आर्थिक नाडीवर वर्चस्वाची लढाई
पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महत्त्व मोठे आहे. सुमारे ३१ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेली ही बँक जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. त्यामुळे बँकेवरील नियंत्रणासाठी होणारी ही निवडणूक केवळ संचालक मंडळाच्या जागांपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी पारंपरिक वर्चस्व कायम ठेवण्याचे, तर भाजपसाठी बँकेतील आपले स्थान वाढविण्याचे आव्हान या निवडणुकीत असेल. त्यामुळे आगामी काळात उमेदवार निश्चिती, संस्थांचे ठराव आणि तालुकानिहाय समीकरणे स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.