
लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये 'पीडीआरएफ'ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच
पिंपरी : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन आणि जलमय परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांना पाण्याचा वेढा पडला आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक नागरिकांसाठी देवदूत ठरले आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव आणि लोणी काळभोर या भागांत राबवलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
लोणावळा आणि मावळ परिसरात थरारक सुटका
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मावळ आणि लोणावळा परिसराला बसला आहे. लोणावळ्यातील ‘ग्रीन लँड व्हिला’ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांची जवानांनी सुरक्षित सुटका केली. कार्ले येथील ‘माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटी’मध्ये पाणी शिरल्याने २१ नागरिक अडकले होते; त्यांना लाइफ जॅकेट, लाइफ रिंग आणि दोरांच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
याशिवाय, इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरातातून ३ जणांना, तर मळवली येथील ‘सूर्य व्हिला’ परिसरातून २० नागरिकांसह एका पाळीव कुत्र्यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मळवली-बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटीतील १५, तर वाकसाई येथील वालोसिटी, मँगो आणि ओरिकल व्हिला परिसरातील ३४ नागरिकांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली.
लोहगावमध्ये बसमधील प्रवाशांना वाचवले
लोहगावमधील आदर्श नगर भागात रस्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने एक प्रवासी बस पाण्यात अडकली होती. या बसमधील १० ते १२ प्रवाशांची जवानांनी तत्परता दाखवत सुखरूप सुटका केली.
भूस्खलन व बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू
खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाण्यात बुडालेल्या एका व्यक्तीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे, तर शेलू येथे पाण्यात बुडालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, लोणावळ्यातील ‘नॉर्थ पॉईंट’ आणि ‘श्री सिक्स्टी रिसॉर्ट’ परिसरात दरड कोसळल्याची (भूस्खलन) घटना घडली असून, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याच्या संशयावरून तेथे युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू आहे.
प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि पीडीआरएफचे जवान अत्यंत तत्परतेने आणि समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” — डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.