
दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट...; पोलीस आयुक्तांचा इशारा
पिंपरी : दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उत्सवांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्य, आक्षेपार्ह हावभाव अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार आढळल्यास संबंधित आयोजक मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘श्री मोरया पुरस्कार २०२५’ पारितोषिक वितरण सोहळा आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा उत्कृष्ट देखावे आणि शिस्तबद्ध व उल्लेखनीय पद्धतीने मिरवणूक आयोजित करणाऱ्या १४ सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, विविध परिमंडळांचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे सुमारे एक हजार पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शहरात यंदा दहीहंडीच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उत्सवाच्या कार्यक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दहीहंडी उत्सवातील कार्यक्रमांबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक तसेच संबंधित व्यक्तींवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्सवाच्या नावाखाली अश्लीलता किंवा अनुचित प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन दिले जाणार नाही, असे पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.
चाकणला पहिला, पिंपळगावला दुसरा तर बावधनच्या महिला गणेश मंडळाला तिसरा पुरस्कार
पोलीस आयुक्तालय स्तर :
प्रथम – मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण
द्वितीय – सुवर्ण मित्र मंडळ, क्रीडा व कला मंच, पिंपळगाव
तृतीय – सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन
परिमंडळ-१ :
प्रथम – एस.के.एफ. गणेश उत्सव मंडळ, एस.के.एफ. कंपनी, चिंचवड
द्वितीय – भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव, सांगवी
तृतीय – स्वराज्य मित्र मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी
परिमंडळ-२ :
प्रथम – सम्राट मित्र मंडळ, हिरामण बारणे चाळ, थेरगाव
द्वितीय – शिवतेज मित्र मंडळ, उर्से, शिरगाव
तृतीय – गणेश तरुण मित्र मंडळ, तळेगाव दाभाडे
परिमंडळ-३ :
प्रथम – नवयुग मित्र मंडळ, म्हाळुंगे चौक, चाकण.
तृतीय – जय बजरंग मित्र मंडळ, जाधववाडी, चिखली.
विशेष पुरस्कार :
आदर्श देखावा – विशाल मित्र मंडळ, थेरगाव-वाकड.
आदर्श मिरवणूक – श्री सिद्धपती मित्र मंडळ, सद्गुरू चौक, रावेत.
मयूर मित्र मंडळाला फिरता करंडक
पोलीस आयुक्तालय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण यांना प्रतिष्ठेचा ‘श्री मोरया फिरता करंडक’ प्रदान करण्यात आला.