सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उतारा ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला डेअरी फार्म उड्डाणपूल आता पूर्णत्वाकडे सरकला आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा असलेले रेल्वे मार्गावरील स्टील गर्डर बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, येत्या एप्रिलअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.
रेल्वे ब्लॉक घेऊन गर्डरची जोडणी
पुलाच्या कामातील सर्वात जटिल भाग रेल्वे क्रॉसिंगचा होता. यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात आला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने दररोज स्टील गर्डर बसवून त्यांची जोडणी केली जात आहे. गर्डरचे काम पूर्ण होताच स्लॅब टाकणे, डांबरीकरण आणि अंतिम फिनिशिंगची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.
प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची होणार बचत
पिंपळे सौदागर, रहाटणी आणि पिंपरी कॅम्प या भागांतून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी डेअरी फार्म मार्ग हा मुख्य दुवा आहे. मात्र, येथील रेल्वे फाटकामुळे वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. या पुलामुळे सुमारे १,२९० मीटरचा प्रवास विनाअडथळा होणार असून, परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.
अडथळ्यांची शर्यत पार
२०२३ मध्ये या कामाला सुरुवात झाली खरी, पण वृक्षतोड, तांत्रिक परवानग्या आणि रेल्वे विभागाच्या मंजुरी प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. मात्र, महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सर्व तांत्रिक अडचणींवर मात करत आता प्रकल्पाला गती दिली आहे. एप्रिलअखेर हा पूल कार्यान्वित झाल्यास शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
पुलाची ठळक वैशिष्ट्ये
| घटक | तपशील |
|---|---|
| एकूण लांबी | १२९० मीटर |
| पुलाची रुंदी | १७.२० मीटर |
| स्टील गर्डर | ०७ नग |
| अपेक्षित मुहूर्त | एप्रिल २०२४ अखेर |






