Bharat Taxi News: भारत टॅक्सी'च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर
खासगी अॅप आधारित कंपन्यांकडून गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जाते. तसेच चालकांकडून प्रत्येक प्रवासामागे कमिशनही वसूल केले जाते. या पार्श्वभूमीवर ‘भारत टॅक्सी’ने चालकांकडून कोणतेही कमिशन किंवा अतिरिक्त शुल्क न घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या शुल्क पद्धतीला कंटाळलेले चालक या सेवेकडे वळत आहेत. काही दिवसांपूर्वी ३५ हजारांवर असलेली चालकांची संख्या आता ६० हजारांवर पोहोचली आहे.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’च्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. देशभरातील खासगी अॅप आधारित कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश आहे. मुंबईतील प्रतिसादानंतर पुण्यातही या सेवेचा विस्तार होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी दरानुसार प्रवासी सेवा दिली जात आहे. भाडे आकारणीत कोणतेही छुपे शुल्क नसल्याने चालकांसह प्रवाशांचाही प्रतिसाद वाढत असल्याचे भारत टॅक्सीचे शहर प्रमुख मोहित मित्रा यांनी सांगितले.
भारत टॅक्सीचे प्रति किलोमीटर दर :
वाहन प्रकार. दर
रिक्षा. १८ रुपये
हॅचबॅक. २४ रुपये
सिडान. २५ रुपये
एसयूव्ही. ३१ रुपये
ठळक आकडेवारी :
एकूण चालक : ६० हजार
महिला चालक : ३०० हून अधिक
यापूर्वीची चालक संख्या : ३५ हजार
Ans: पुण्यातील ३०० हून अधिक महिला चालक 'भारत टॅक्सी' सेवेशी जोडल्या गेल्या असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण चालकांची संख्या ६० हजारांवर पोहोचली आहे.
Ans: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'च्या माध्यमातून खासगी ॲप आधारित कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
Ans: भारत टॅक्सीमध्ये चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जात नाही, तर प्रवाशांना गर्दीच्या वेळेत जादा भाड्याचा भुर्दंड न बसता सरकारी दरानुसार पारदर्शक भाडे आकारणीचा लाभ मिळत आहे.






