
हस्तकला, लोककलेच्या मागणीत घट; पेठांमधील ग्रहकांची संख्या कमी होत असल्यामुळे कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न
पुणे/गायत्री पवळे : संस्कृतीची ओळख जपणारे पुण्यातील पारंपरिक कला बाजार आज गंभीर ऱ्हासाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तुळशीबागेतील काचेच्या बांगड्या, कसबा पेठेतील कुंभारवाडा, बोहरी आळीतील लाकडी हस्तकला आणि जुन्या बाजारातील पारंपरिक वस्तू या सर्व ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने कारागिरांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलती ग्राहकवृत्ती, स्वस्त मशीननिर्मित वस्तू, ऑनलाइन खरेदीचा वाढता प्रभाव आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती यामुळे हा पारंपरिक व्यवसाय दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्याचे दिसते.
पुण्यातील तुळशीबाग परिसर पूर्वी पारंपरिक काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध होता. मात्र आता नव्या पिढीचा कल ब्रेसलेट्स आणि फॅशन ज्वेलरीकडे वळल्याने बांगड्यांच्या दुकानांवरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. विक्रेत्यांच्या मते, लग्नसमारंभ आणि सणावाराच्या काळातही पूर्वीसारखी विक्री होत नाही. परिणामी, अनेक लहान दुकानदारांना हा व्यवसाय तोट्यात चालवावा लागत आहे.
याचप्रमाणे कसबा पेठेतील कुंभारवाड्यातही पारंपरिक मातीच्या वस्तूंना सुद्धा मागणी कमी झालेली आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर मडके व मातीच्या अनेक भांड्यांना मागणी वाढत असे, पन सध्याच्या काळात ती मागणी कमी होत असताना दिसत आहे. दिवे, माठ, शोभेच्या वस्तू आणि मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना स्वस्त दरातील बाहेरील राज्यांतून येणाऱ्या वस्तूंमुळे तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते. स्थानिक कारागिरांचे म्हणणे आहे की, माती, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढला असताना ग्राहक मात्र स्वस्त पर्याय शोधत आहेत. त्यामुळे हाताने बनवलेल्या वस्तूंचे महत्त्व कमी होत चालले आहे.
बोहरी आळीतील लाकडी खेळणी, देव्हारे आणि पारंपरिक घरगुती वस्तूंची स्थितीही वेगळी नाही. पूर्वी घराघरांत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आता प्लास्टिक, फायबर किंवा मशीनमेड पर्यायांनी घेतल्या आहेत. काही दशकांपूर्वी या कलेत अनेक कारागीर कार्यरत होते; मात्र आता मोजकीच दुकाने शिल्लक राहिलेली दिसतात .
शहरातील जुना बाजार हाही या बदलाचा साक्षीदार ठरत आहे. एकेकाळी पुरातन वस्तू, पारंपरिक सजावटीचे साहित्य आणि जुन्या कलावस्तूंसाठी प्रसिद्ध असलेला हा बाजार आता स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक साहित्य आणि सर्वसाधारण घरगुती वस्तूंनी व्यापला जात असल्याचे दिसते. यामुळे बाजाराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य कमी होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत केवळ ‘वारसा’ म्हणून भावना व्यक्त करून उपयोग नाही; तर स्थानिक कला बाजारांना डिजिटल प्लॅटफॉर्म, शासकीय अनुदान, डिझाइन प्रशिक्षण आणि नियमित प्रदर्शनांची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा पुण्याची पारंपरिक कला बाजारपेठ पुढील काही वर्षांत केवळ इतिहासाच्या पानांपुरती उरेल.
“आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कुंभारकामाच्या व्यवसायावर आज अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की माठ, घागर, दिव्यांना मोठी मागणी असायची; पण आता प्लास्टिक आणि मशीनमेड वस्तूंनी बाजार व्यापला आहे. कच्चा मालाचा खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च सतत वाढतोय, पण ग्राहक मात्र स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. आम्ही तयार केलेल्या प्रत्येक वस्तूमागे मेहनत आणि परंपरा आहे, पण त्याची योग्य किंमत मिळत नाही. सरकारकडून मदत, बाजारपेठ आणि प्रशिक्षण मिळाले तरच ही कला पुढे टिकू शकेल, नाहीतर पुढच्या पिढीत कोणी हा व्यवसाय करणार नाही. – अशोक कुंभार