
भारतात प्रथमच डीएनए बारकोडिंगवर आधारित प्रजातीचे वर्णन
भारतातील झुरळांच्या अभ्यासात हा एक मैलाचा दगड
झुरळांची एक नवीन प्रजाती शोधण्यात संशोधकांना यश
सुनयना सोनवणे/पुणे: भारतीय उपखंडातील जैवविविधतेत महत्त्वाची भर घालणारी झुरळांची एक नवीन प्रजाती शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी परिसरातील कृषी भागात ही नवी प्रजाती आढळून आली. भारतात प्रथमच डीएनए बारकोडिंगच्या साहाय्याने शोधण्यात आलेली ‘निओलोबोप्टेरा पेनिन्सुलारीस’ ही प्रजाती आहे. भारतातील झुरळांच्या अभ्यासात हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
ही संशोधन मोहीम झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पुणे व चेन्नई केंद्र) आणि प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आली. ए. शबनम, एम. सेनराज, साहिल शिकलगर, रश्मी मोरे आणि के. पी. दिनेश या संशोधकांनी हा अभ्यास केला असून तो कोलकाता येथून प्रकाशित होणाऱ्या ‘रेकॉर्ड्स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
‘निओलोबोप्टेरा’ या वंशातील प्रजाती भारत, चीन आणि थायलंडमध्ये आढळतात. यापूर्वी भारतात या वंशातील केवळ दोनच प्रजाती नोंदविण्यात आल्या होत्या. जागतिक स्तरावर सुमारे ५ हजार झुरळांच्या प्रजाती नोंदल्या गेल्या असून, त्यापैकी सुमारे १९० प्रजाती भारतात आढळतात. यातील जवळपास निम्म्या प्रजाती स्थानिक (एन्डेमिक) आहेत, म्हणजे त्या जगात अन्यत्र आढळत नाहीत.
घरातील झुरळं दूर जाण्यास होतील मजबूर! स्वयंपाकघरातील झुरळे दूर करण्याचे उपाय
झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी हा अभ्यास भारतीय कीटक वर्गीकरणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले. तर पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी डीएनए बारकोडिंगच्या माध्यमातून भविष्यात आणखी महत्त्वपूर्ण शोध लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रा. रश्मी मोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह डेक्कन पठार भागातील झुरळांच्या प्रजातींचा अभ्यास अद्याप मर्यादित असून, आतापर्यंत राज्यातून केवळ १३ प्रजातींचे मूळ वर्णन झाले आहे.
डीएनए बारकोडिंग म्हणजे काय?
डीएनए बारकोडिंग ही प्रजाती ओळखण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. यामध्ये एका विशिष्ट जनुकातील किंवा जनुकांमधील डीएनएच्या लहान भागाचा वापर करून प्रजाती ओळखली जाते आणि डीएनएच्या विशिष्ट भागाचे विश्लेषण केले जाते.
संशोधनाची ठळक वैशिष्ट्ये
– पुणे जिल्ह्यातील नाथाची वाढी परिसरातून शोध.
– भारतात प्रथमच डीएनए बारकोडिंगवर आधारित प्रजातीचे वर्णन.
– जननेंद्रियांची रचना, फिलोजेनेटीक विश्लेषण, डीएनए बारकोडिंग यांचा एकत्रित अभ्यास.
‘झुरळांकडे सामान्यतः किड म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्षात १ टक्क्यांपेक्षा कमी प्रजाती हानिकारक असून बहुतेक झुरळे पर्यावरणात पोषक घटकांचे पुनर्चक्रण करून परिसंस्थेला महत्त्वाचे योगदान देतात. या शोधामुळे डेक्कन पठारासारख्या कमी अभ्यासलेल्या प्रदेशांमध्ये अजूनही अनेक अज्ञात प्रजाती दडलेल्या असल्याची शक्यता अधोरेखित झाली असून, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अशा नोंदी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.’
– शबनम अन्सारी, मुख्य संशोधक