
Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीची व्यक्ती घरी आल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. आरोपीने घरातच धारदार चाकूने वार करून काशीनाथ संभाजी वावळे यांची हत्या केल्याची घटना थेरगावातील मधुबन कॉलनी परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ संभाजी वावळे हे त्यांच्या कुटुंबासह थेरगावातील मधुबन कॉलनीतील पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे राहत होते. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे पावणेआठ वाजण्याच्या सुमारास यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर हा वावळे यांच्या घरी आला.
आरोपी यल्लालिंग आळंदकर याचे वावळे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी पूर्वीपासून कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे तो वावळे यांच्या परिचयाचा होता. मात्र, घरी आल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्याचा वावळे यांच्याशी वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढत गेला.
पैशांच्या व्यवहारावरून सुरू झालेल्या वादादरम्यान आरोपीने संतापाच्या भरात घरातीलच धारदार चाकूने काशीनाथ वावळे यांच्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने वावळे यांच्या शरीरावर चार ते पाच वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात वावळे यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर वावळे यांच्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकरणाची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काळेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर याला अटक केली आहे. हत्येमागील नेमका आर्थिक व्यवहार आणि वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धुमाळे करत आहेत.