
देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर
देवळा : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता देवळा-नाशिक रोडवरील गायत्री नर्सरीसमोर गुरुवारी (दि. १३) रात्री सव्वादहाच्या सुमारास एसटी बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंबादास यशवंत कुवर (३०, रा. अजंग वडेल, ता. मालेगाव), भरत फकीरा पवार (१७, रा. सोमपूर, ता. सटाणा) आणि मनोहर प्रकाश वाघ (३०, रा. नवी बेज, ता. कळवण) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही भऊर येथे मजुरीचे काम करीत होते. गुरुवारी रात्री ते भरत पवार यांच्या काळ्या रंगाच्या महिंद्रा सेंचुरो दुचाकीवरून (एमएच १७एवाय २३४१) भाबडबारी घाटातून देवळ्याच्या दिशेने येत होते. यावेळी गायत्री नर्सरीसमोर मागून आलेल्या सटाणा आगाराच्या सटाणा-पुणे एसटी बसने (एमएच १४ एलएक्स ७८५१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक बस घटनास्थळीच सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली आहे.
हे सुद्धा वाचा : पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर
चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी मयत अंबादास यांचा भाऊ श्रीराम यशवंत कुवर यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसचालकाने अत्यंत बेदरकारपणे वेगाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला मागून धडक दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. धडक देऊन अंबादास कुवर व त्याचे दोन मित्र भरत फकीरा पवार व मनोहर प्रकाश वाघ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मृत्यूला तसेच दुचाकी व बसच्या नुकसानीला बसचालक कारणीभूत झाला आहे व झालेल्या अपघाताची खबर पोलिस स्टेशनला न देता पळून गेला म्हणून बस चालकावर देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस करत आहेत.