
३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती
उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक संजय जंगम आणि रवींद्र कुंभारदरे यांच्या हस्ते नटराज व गणेशपूजन करण्यात आले. यावेळी नाट्यशिव प्रतिष्ठानचे संस्थापक किसनराव खामकर, नगरसेवक संजय जंगम, अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. डी. बावळेकर, बाळासाहेब पवार, किल्ले स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, शिरीष गांधी, आनंद उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीच्या सुट्टीत शहरातील बालचमू चिखलाने माखलेले हात आणि कपड्यांची पर्वा न करता पेटिट ग्रंथालयाच्या मैदानावर किल्ले साकारण्यात दंग झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यशिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही मुलांनी अनेक दिवस मेहनत घेत विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत.
गिरिस्थान मुलींच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी साकारलेला प्रतापगड, गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उभारलेला पन्हाळगड, गिरिस्थान पत्रकार संघाने साकारलेला सज्जनगड आणि नाट्यशिव प्रतिष्ठानचे किसनराव खामकर यांनी साकारलेला अजिंक्यतारा हे किल्ले विशेष लक्षवेधी ठरले. याशिवाय प्रचंडगड, रायगड, मल्हारगड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृतीही बालचमूंच्या कल्पकतेची आणि मेहनतीची साक्ष देत आहेत.
यावेळी नाट्यशिव प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आ. भा. म. ना. परिषद नियामक मंडळाचे सदस्य राजेश कुंभारदरे यांनी केले. किल्ले स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर यांनी स्पष्ट केला. नगरसेवक संजय जंगम यांनी महाबळेश्वर पालिकेच्या वतीने भविष्यातही नाट्यशिव प्रतिष्ठानच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
स्पर्धेला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असून पर्यटकही किल्ले पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत. बालचमूंच्या कलाकुसरीचे पर्यटकांकडून कौतुक होत आहे. पुढील आठवडाभर हे किल्ले नागरिक आणि पर्यटकांना पाहता येणार आहेत. विविध वयोगटांसाठी रोख रक्कम आणि आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
हे सुद्धा वाचा : जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाट्यशिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव खामकर, उपाध्यक्ष प्रभाकर देवकर, सचिव अरुण शिंगरे यांच्यासह श्रीकांत जाधव, संदीप देवकुळे, राजेश कुंभारदरे, विजयराज भिलारे, चिन्मय अगरकर, महेश गुजर, रणजित तांबे, गोविंद कदम, दिनेश भिसे, रविकांत संकपाळ, दीपक बावळेकर, नितीन परदेशी, लीलाताई शिंदे, मीराताई वाडकर, वृषाली डोईफोडे आदी परिश्रम घेत आहेत.
Ans: महाबळेश्वरमध्ये यंदा नाट्यशिव प्रतिष्ठानच्या वतीने ३५व्या भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Ans: प्रतापगड, पन्हाळगड, सज्जनगड आणि अजिंक्यतारा या किल्ल्यांच्या प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरल्या. याशिवाय रायगड, मल्हारगड आणि प्रचंडगडाच्या प्रतिकृतीही साकारण्यात आल्या आहेत.
Ans: किल्ले प्रदर्शनाला पर्यटक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील आठवडाभर हे किल्ले पाहता येणार आहेत.