
Why did NCP Ajit Pawar give ticket to a criminal background Andekar family pune politics
अजित पवारांकडून आंदेकर कुटुंबामध्ये उमेदवारी
विरोधकांकडून जोरदार टीकेनंतर आंदेकर कुटुंबियांचे स्पष्टीकरण
आंदेकरांच्या महिलांनी घेतली पत्रकार परिषद
Candidacy in the Andekar family : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राजकीय टीकेला उधाण आले आहे. पुण्यामध्ये अनेक वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच महायुतीचे तिन्ही घटक पक्ष हे वेगवेगळे लढत आहेत. यामुळे निवडणुकीला रंगत आली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये आंदेकर कुटुंबियामध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून ही उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे जोरदार टीका देखील करण्यात आली आहे. याबाबत आता आंदेकर कुटुंबियातील महिलांनी पुढे येत भूमिका स्पष्ट केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ मधील उमेदवारीवरून मोठी चर्चा सुरू आहे. आरोपी बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी कॉँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबीय भावनिक झाले असून, “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी आर्त भावना आंदेकर कुटुंबातील मुली, महिलांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : संजय राऊत अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये 11 लाखांची पैज; फक्त अट एकच..!
राष्ट्रवादी काँग्रेस कडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी देण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २३ मध्ये रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करत आहेत. पत्रकार परिषदेला आंदेकर कुटुंबियांसाह प्रभाग 23 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत कोठावले, खान शहाबाज महमंद शरीफ आदि उपस्थित होते.
विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय
यावेळी प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या, “आम्ही जिथे जातो तिथे लोक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या आहेत.
तसेच रिया आंदेकर भावना व्यक्त करत म्हणाल्या, “लहानपणी मी वडिलांचा प्रचार पाहिला आहे. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आम्हाला पूर्ण करायची आहेत. जे काही घडले, त्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आता हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. सध्या मी आणि माझी लहान बहीण एकट्याच राहत आहोत,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.
हे देखील वाचा : “राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या…, श्रीमुखातून माणसाची औलाद “, सदावर्तेंचा राज-उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
प्रभागात आंदेकरांचे काम बोलते
प्रियांका आंदेकर म्हणाल्या, ”प्रचारात आम्हाला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या कामाची मतदार आठवण काढतात याच कामाची पोचपावती म्हणून आजितदादांनी कुटुंबीयांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. विरोधक काहीही बोलत असले तरी प्रभागात आंदेकरांचे काम बोलते, हे वास्तव आहे. ” असा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ प्रभागाची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.