मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा (ShivSena MLA disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (Shinde group) बाजूने निकाल देत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याचे सांगितले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात आला. या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) देखील गेला आहे. मात्र आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महापरिषदचे आयोजन केले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
वरळी डोम येथे उद्धव ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या महापत्रकार परिषदेमधून ठाकरे हे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयाची चिरफाड करणार आहेत. यामध्ये ठाकरे गट काही पुरावे देखील सादर करणार असून यावेळी ठाकरेंसोबत कायदे तज्ज्ञ देखील असणार आहेत. उद्धव ठाकरेंची ही महापत्रकार परिषद 4 वाजता असणार असून यानंतर लगेचच हा निर्णय देणारे राहुल नार्वेकर देखील पत्रकार परिषद घेणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून जोरदार नाराजी व्यक्त केली जात होती. आता पत्रकार परिषदेमधून नार्वेकरांचा निकाल चूकीचा असल्याचा दावा ठाकरे गट करणार आहे. या पत्रकार परिषदेला नार्वेकर स्वतः पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देणार आहेत. 4 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद असून 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पत्रकार परिषद असणार आहे. या दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये नवीन राजकीय गौप्यस्फोट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.