पुस्तकांचं गाव म्हणून खोपोलीला मिळणार बहुमान ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
खोपोली/प्रवीण जाधव: बु’ज हास्य परिवाराचा 22 वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा नामदार उदय सामंत व आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,खोपोलीला पुस्तकांचे गाव घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल.. असे प्रतिपादान उदय सामंत (मंत्री उद्योग व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य) यांनी यावेळी बोलताना केले.
खोपोलीतील सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बु’ज हास्य परिवाराचा 22 वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. लायन्स सर्व्हिस सेंटर, खोपोली येथे आयोजित या भव्य सोहळ्यात नृत्य, संगीत, योग आणि वार्षिक पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात मंत्री ना. उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना तसेच भरतनाट्यमद्वारे नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना सादर केली यावेळी ‘माझी वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार उदय सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य) यांनी “हास्य क्लबची आवश्यकता केवळ सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर राजकारण्यांनाही आहे! हास्य क्लबसारखे उपक्रम राज्यभर व्हावेत. खोपोली हे सांस्कृतिक केंद्र म्हणून अधिक प्रगती करेल.”असे सांगत यावेळी त्यांनी खोपोलीला ‘पुस्तकांचे गाव’ घोषित करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना “बु’ज हास्य क्लबने समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. खोपोलीच्या सामाजिक जडणघडणीत या क्लबचा मोठा वाटा आहे. या कार्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य मी नक्कीच करेन.”हास्य, आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा संगम असलेल्या या सोहळ्याने खोपोलीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकली आहे तर हास्य क्लब आनंदाची परंपरा पुढे नेणारा परिवार आहे यावेळी हास्य क्लबच्या वास्तू उभारणीसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आश्वासन दिले आहे.