
धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला आणि विद्यार्थ्यावर दगडांचा मारा
भिवपुरी येथे टाटा कंपनीच्या धरणाचे काम सुरू असून, त्यासाठी सातत्याने सुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमुळे उडणारे दगड तापकीरवाडी येथील घरांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशाच एका घटनेत दगड अंगावर पडल्याने एक महिला आणि एक शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या प्रतिनिधींनी तापकीरवाडी येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
केवळ तापकीरवाडीच नव्हे, तर धनगरवाडीतील घरांनाही धरणाच्या ब्लास्टिंगचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुरुंग स्फोटांमुळे घरांना हादरे बसणे, भिंतींना तडे जाणे आणि मोठ्या आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण होणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. घरांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी राहत असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
तापकीरवाडीतील आदिवासी रहिवाशांना घरे बांधण्यासाठी कंपनीकडून जमीन उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे धरणाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरही त्यांना त्याच परिसरात जीव मुठीत धरून राहावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
तापकीरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडीतील ब्लास्टिंगमुळे बाधित झालेल्या सर्व घरांचे तातडीने स्वतंत्र तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ब्लास्टिंगची तीव्रता आणि जमिनीतील कंपनांची शास्त्रीय पद्धतीने नोंद घ्यावी, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे आणि नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी घरांची पाहणी केली होती. मात्र, नुकसानभरपाईचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे कंपनी आणि प्रशासनाने संभाव्य दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत तहसीलदार, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती जखमी कुटुंबातील हेमंत नवले यांनी दिली. ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी बाधित ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तारळी प्रकल्पाला MPCB चा थेट ‘स्टॉप वर्क’ आदेश; अदानी प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश
Ans: भिवपुरी येथील टाटा धरणाच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटात दगड उडून लागल्याने तापकीरवाडीतील एक महिला आणि एक शाळकरी विद्यार्थी जखमी झाले.
Ans: दोन्ही जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Ans: तापकीरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडीतील बाधित घरांचे स्वतंत्र तांत्रिक सर्वेक्षण करावे, ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या कंपनांची शास्त्रीय पद्धतीने नोंद घ्यावी, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.