कर्जत/ संतोष पेरणे: पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावर मागील पाच महिने सुरु असलेल्या पावसाने दुरवस्था केली होती. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी वाहून नेणारी गटारे बंद झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी हे डांबरी रस्त्याने वाहत जात असते आणि त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. दरम्यान नेरळ माथेरान घाटरस्त्याची दुरुस्ती रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सुरु असून आगामी काही दिवसांनी माथेरान येथील पर्यटन हंगाम सुरु होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल नेरळ माथेरान टॅक्सी संघटना यांच्याकडून बांधकाम खात्याचे आभार मानले जात आहेत.
मुंबई पुण्यासारख्या शहरी भागापासून जवस असूनही या ठिकाणी वनराई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे साधारण पाच हजार मिलीमीटर पाऊस माथेरान मध्ये होत असतो.माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव रस्ता असून हा रस्ता डांबरी आहे.नेरळ माथेरान दस्तुरी या भागातील आठ किलोमीटर लांबीचा रस्ता हा डांबरी असून पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी घाटरस्त्यात एका बाजूने आरसीसी सिमेंटच्या माध्यमातून गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र घाटरस्त्यातील अनेक गटारे दगडामाती यांनी भरली असल्याने पावसाळ्यात अशा ठिकाणी पावसाचे पाणी गटारऐवजी रस्त्यातून वाहत जाते. त्याचा परिणाम माथेरान घाटातील डांबरी रस्ते खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. गतवर्षी नेरळ माथेरान घाटरस्त्यातील नेरळ हुतात्मा चौक ते जुम्मापट्टी या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण केले नसल्याने यावर्षच्या पावसाळ्यात घाटरस्त्यात मोठ्या प्र्तमानात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.घाटरस्त्यात प्रामुख्याने जुम्मापट्टी वळण आणि चांगभले वळणावरील खड्ड्यांची मालिका मोठी होती.
या ठिकाणी अनेक दुचाकी चालक यांना अपघात झाले. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने होत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने माथेरान नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील माथेरान नेरळ घाटरस्त्यातील खड्डे डांबर टाकून भरण्याचे काम सुरु केले आहे . ज्या ठिकाणी खड्डे भरण्यासाठी डांबर टाकले जाणार आहे त्या त्या ठिकाणी खड्ड्यातील माती बाजूला करण्याच्या सूचना नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने दिल्या आहेत.टॅक्सी संघटनेकडून घाटरस्त्यात खड्डे भरले जात असल्याने समाधान व्यक्त केले असून काही दिवसांनी दिवाळी पर्यटन हंगाम सुरु होणार असून या काळात मोठ्या प्रमाणात दिवस रात्र पर्यटकांची रीघ सुरु असते. पर्यटनाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर माथेरान हे महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे आता प्रशासमनाने घाट रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे जेणेकरुन पर्यटकांचा ओघ अजून वाढावा यासाठी प्रशासानाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.