पोयनाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने आज पोयनाड येथे एक भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली.
या रोजगार मेळाव्यात एकूण ४० हून अधिक नामांकित उद्योग आणि कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी सर्व्हिसेस, हेल्थकेअर, आयटी व मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर २,५०० हून अधिक तरुणांनी मेळाव्यात उपस्थित राहून मुलाखतीसाठी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले, ही या मेळाव्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली. रोजगार शोधणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, कामगार नेते दीपक रानवडे, रसिका केणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर भाष्य करत तरुणांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि उपलब्ध कौशल्यांचा योग्य वापर करून यशस्वी करिअर घडवण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाबद्दल बोलताना राजा केणी म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून अधिकाधिक तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
या मेळाव्यामुळे पोयनाड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांनी देखील या परिसरातील तरुणांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.
राजा केणी यांच्या या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील तरुणांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून, हा रोजगार मेळावा भविष्यातील अनेक रोजगार उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.