जागतिक पातळीवर आज पर्यावरण दिन साजरा होत आहे मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होणारी घटना पोलादपूर येथे पाहायला मिळत आहे. पोलादपूर तालुका हे निसर्गमय ठिकाण असून येथील बहुतांशी गावे ही डोंगरमाथ्यावर व सावित्री, ढवळी, कामथी नदीच्या तिरावर वसलेली आहेत.पोलादपूर तालुक्याचे हिरवेगार सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी तालुक्यात दाखल होत असतात. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावच्या जलवाहिन्या ह्या नद्याच्या तिरावर आहेत.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये एमआयडीसी परिसरातील काळसर केमिकल वेस्ट पांढऱ्या रंगाच्या बॅग्समध्ये भरून बिंदास्तपणे पोलादपूर वाई सुरूर मार्गाशेजारी टाकण्याचे कारनामे सुरु आहेत. यामुळे नळ, बोअरवेल, नद्या, नाले यामध्ये रासायनिक पाण्याचा प्रभाव जाणवू लागला असून लाल व काळ्या रंगाचे पाणी आल्याच्या घटना घडल्या आहेत. कापडे नाक्यावरील श्याम इंटरप्राईझेस दुकानाच्या मागच्या बाजूस अज्ञात इसमाने केमिकल वेस्ट टाकल्याने कापडे ग्रामपंचायत हद्दीतील काही वाड्यांमध्ये बोअरवेलचे लालसर रंगाचे पाणी आल्याची घटना घडली. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खांबेश्वरवाडी येथील बोअर वेल सुद्धा लाल आणि काळ्या रंगाचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये घाबराहट पसरली आहे. दरम्यान वाकण ग्रुप पंचायतीने या लालसर काळ्या पाण्याचा शोध लावून त्याचे कारण शोधण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या पाण्यात देखील केमिकलच्या वेस्टचा अंश असल्यास हे पाणी पिण्यासाठी धोकादायक ठरु शकते. प्रस्तुत प्रतिनिधीने सरपंच जंगम यांची भेट घेतली असता पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ह्या घटना ताज्या असतानाच आंबेनळी घाटातील कुंभलवणे फाट्याजवळ रस्त्यालागत शेकडो बॅग केमिकल वेस्ट रात्रीच्या वेळेस टाकण्याचा कारनामा केला असून पोलादपूर तालुक्यातील डोंगरभाग, रस्त्यालगतची गावे महाड एम आय डी सी साठी डम्पिंग ग्राउंड होत आहेत का?? हा सवाल जनतेतून विचारला जात आहे. प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या मते, यामागे कोणीतरी संगनमताने हे घाणेरडे रसायन टाकत असून, या रासायनिक वेस्टमुळे परिसरातील माती पूर्णतः खराब झाली आहे. याचा गंभीर परिणाम येत्या काळात लोकांच्या आरोग्यावर आणि निसर्गावर होऊ शकतो.त्यामुळे केमिकल वेस्ट माफियांवर संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.