कर्जत/संतोष पेरणे: तालुक्यातील दुर्गम भागात डोंगरावर असलेल्या तुंगी गावाकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीस बंद झाला आहे.पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे.सर आली आणि रस्ता वाहून गेला असे म्हणण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे. दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी सूचना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केली आहे.
तुंगी या गावाला 2023पर्यंत रस्ता नव्हता आणि डोंगरावर असलेल्या गावात रस्ता नेण्यासाठी वन जमिनीचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रस्ता बनला होता.मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांतून वन जमिनीची परवानगी आणली आणि त्यानंतर डोंगर फोडून रस्ता बनविण्यात आला.त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे हे या गावात पोहचलेले पहिले वाहून घेऊन जाणारे पहिले खासदार आणि पहिले व्यक्ती ठरले होते.तुंगी या दुर्गम भागात खासदार बारणे यांच्या प्रयत्नांतून रस्ता गेला आणि त्यानंतर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून डोंगर पाडा ते तुंगी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले.२०२४ मध्ये मार्च एप्रिल या दरम्यान डांबरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर वाहने जाऊ लागली पण पहिल्याच पावसात रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.त्यानंतर नोव्हेंबर 2024मध्ये तुंगी गावाकडे जाणारा रस्ता पुन्हा बनविण्यात आला.मात्र हाच रस्ता 25-26 मे रोजी झालेल्या अवकाळी आणि पूर्व मान्सूनच्या पावसाळात अनेक भागात वाहून गेला आहे.
एखाद्या गावाला जोडणारा रस्ता वाहतुकीस बंद झाला असल्याने आता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांच्याकडून तुंगी गावातील रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला बहुसंख्य ठिकाणी मजबूत गटारे बांधण्यात आलेली नाही.रस्ता बनविताना केवळ रस्त्याच्या बाजूने पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी जेसीबी मशीन ने साधे गटार बनविले होते.मात्र डोंगरातून वाहून येणारे पाणी हे डोंगरातील माती दगड घेऊन रस्त्यावर येत असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.त्यात 26मे नंतर आता वाहने घेऊन प्रवास करणे कठीण होऊन गेले आहे.त्यामुळे तुंगी ग्रामस्थांच हाल होऊ लागले आहेत.रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने पावसाळ्यातील चार महिने या कालावधीत वाहने नेता येणार नसल्याने ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होणार आहेत.
डॉ धनंजय जाधव.. तहसीलदार आणि प्रमुख आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा
आम्हाला तुंगी गावाकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांना झाला आहे.त्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या रस्त्याची पाहणी आणि शक्य असल्यास जलदगतीने दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे.