
Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
शेकापच्या वतीने भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पामुळे होत असलेल्या जंगलतोडीची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, मुख्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह कर्जत तालुक्यातील स्थानिक नेते श्रीराम राणे, प्रकाश फराट, स्विटी बार्शी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो सौजन्य – AI Created)
या प्रसंगी बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, “कोणतीही रीतसर निविदा न काढता परस्पर या ठिकाणी प्रकल्प लादण्याचा घाट घातला जात आहे. रायगड जिल्ह्यात शेकाप आणि समविचारी पक्षांची पर्यावरणाबाबत स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारे वृक्षतोड करून टोरंटसारखे प्रकल्प लादले जात असतील, तर ते हाकलून लावल्याशिवाय शेकाप शांत बसणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, माजी आमदार बाळाराम पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला.
“कोकणात पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधणे शक्य असताना जंगल उद्धवस्त करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. रोजगाराच्या नावाखाली स्थानिकांची दिशाभूल केली जात असून, प्रत्यक्षात बाहेरील राज्यांतील कामगारांना प्राधान्य दिले जाण्याची भीती आहे. आम्ही महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही”, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
कोकणात निसर्गाचे जतन करून पर्यटनातून विकास साधण्याऐवजी जगल उद्ध्वस्त केले जात आहे. रोजगाराच्या गप्पा मारणारे सरकार स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगाराच्या संधी देणार आहे. आम्ही महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही. – बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप