कर्जत/संतोष पेरणे : राज्यभर पावसाची दमदार बॅटींग सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या जोरदार पावसाचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांना देखील बसत आहे. नेरळ गावात असलेल्या रायगड जिल्हा परिषद उर्दू माध्यमाच्या शाळेच्या समोर असलेल्या पटांगणात पाणी साचल्याने विद्यार्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नेरळमधील दगडी शाळा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या आवारात दोन अंगणवाड्या असून त्या ठिकाणी येणारं लहान बालके यांना देखील त्या डबक्यातील पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात 100 वर्षापूर्वीची दगडी शाळा असून या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मध्ये गेल्या काही वर्षापासून उर्दु माध्यमाची शाळा भरवली जाते.तेथील चार वर्ग खोल्यामध्ये जिल्हा परिषदेची उर्दु माध्यमाची शाळा चालविली जाते.तर त्याच शाळेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीचे वतीने चालवण्यात येणाऱ्या दोन अंगणवाड्या त्या ठिकाणी आहेत.
उर्दु शाळेमध्ये नेरळ ग्रामपंचायत हद्दी मधील 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर दोन अंगणवाडी शाळेत पोषण आहार घेण्यासाठी येणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे.मात्र त्या ठिकाणी असलेले पटांगण हे खोलगट भागात बनले असल्याने पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून राहते.त्यामुळे अंगणवाडी येणाऱ्या बालकांना त्या पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागते.त्यामुळे कोणतेही पालक आपल्या बालकांना एकटे न सोडता घरातील कोणीतरी व्यक्ती अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी आणून सोडत होते.
दगडी शाळेच्या आवारात पावसाळ्यात साचलेले पाण्याचे डबके यांबाबत काही जागरूक रहिवाशांनी नेरळ ग्रामपंचायत कडे त्याबाबत तक्रारी केल्या.त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत कडून तत्काळ ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी शाळेच्या आवाराची पाहणी केली.त्यानुसार आवारात असलेल्या पटांगणातील पाणी बाहेर काढण्यासाठी मार्ग बनण्याच्या सूचना कर्मचारी वर्गाला देण्यात आल्या.मात्र अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालकांची अवस्था या डबक्यातून वाट काढताना दयनीय होत होती.उर्दू माध्यमाच्या शाळेतील मोठी मुलं यांना त्या डबक्यातून वाट काढायला कोणत्याही अडचणी नव्हत्या.परंतु अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालकांना मात्र अडचणीला सामोरे जावे लागत आहे.