आज दसऱ्यानिमित्त सकाळपासूनच सर्व नेत्यांकडून मेळावे घेतले जात आहे. सकाळी पंकजा मुंडे, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा घेतला. आता सायंकाळी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. त्यावेळी दोन्ही राजकीय नेते काय बोलणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेचा आजचा मेळावा हा आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्याठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आझाद मैदानावर पावसालाही सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्कवरही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या दोन्ही दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे.
दसरा मेळावा एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचे वातावरण तयार करणार
शिंदेंच्या दसरा मेळावा हा मागील वर्षीप्रमाणे बीकेसी येथे घेण्याचा विचार होता मात्र वाहतुक समस्येमुळे हा मेळावा तेथे न घेता आझाद मैदानावर घेण्यात येत आहे. याठिकाणी सुमारे 50 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. येत्या काही दिवसातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ठाकरे आणि शिंदे नेमका काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. हा दसरा मेळावा एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचे वातावरण तयार करणार आहे.
विधानसभा निवडणूकीत काटे की टक्कर
दोन दिवसांपूर्वी आलेल्या हरयाणाच्या निकालामुळे महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तसेच महायुती सरकारकडून योजनांचा पाऊस पाडला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत रेकॉर्डब्रेक निर्णय घेतले जात आहेत. त्याद्वारे नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. शिंदे सरकारकडून अनेक ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही गेल्या दोन महिन्यात अनेकदा महाराष्ट्रात प्रकल्पांच्या उद्घाटनसाठी अथवा भुमिपूजनाकरिता येत आहेत. त्यामुळे लोकसभेचा निकाल विधानसभेत बदलायचा असा चंग महायुतीने बांधला आहे. मात्र महाविकास आघाडी ही लोकसभेत जबरदस्त कामगिरी विधानसभेतही कायम ठेऊ आणि जनतेचा कल आमच्या कडे आहे असा विश्वास मविआच्या नेत्यांना आहे. यामुळे विधानसभा निवडणूकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.