नाशिक : जिल्ह्यातील (Nashik Lok Sabha) दोन्ही जागा महायुतीने प्रतिष्ठेच्या केलेल्या असताना दोन्ही जागांवर मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाल्याने पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे तिन्ही मंत्री आपला फारसा प्रभाव दाखवू शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे नाशिकची जागा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. अवघ्या आठ दिवसात त्यांनी सहा दौरे करून निवडणूकीची सूत्रे ताब्यात घेतली होती. तर स्वयंघोषित संकटमोचक असलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटचे तीन दिवस नाशकात तळ ठोकून निवडणुकीचे वारे फिरविल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी आपला बहुतांशी वेळ खर्ची केला.
अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील निवडणूक काळात नाशकात तळ ठोकून होते. त्यांनी थेट प्रचारात सहभाग घेतला नसला तरी, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली होती.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आदी केंद्रीय नेतृत्वाने देखील जाहीरसभा घेऊन निवडणुकीत रंगत भरली असली तरी, त्यांचा करिष्मा दिसू शकला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी पाहता महायुतीचे मंत्रीही निष्प्रभ ठरल्याचे मानले जात आहे.
विधानसभेत बदल?
लोकसभा निवडणुकीत तिन्ही मंत्री निष्प्रभ झाल्यामुळे महायुती आता विधानसभेची रणनीती बनवताना काही बदल करते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीतील मतदारांचा कल बदलण्याची जबाबदारी आता महायुतीच्या नेत्यांना स्वीकारावी लागणार आहे.