
Krishna River Overflows: महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहून जाणाऱ्या कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाण्याचा तातडीने उपसा करून ताकारी, म्हैशाळ व टेंभू उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. या योजनांद्वारे दुष्काळी भागातील तलाव तातडीने भरावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी निवेदनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सात जूनपासून पावसाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने सांगली जिल्ह्यासह परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र १ जुलैपासून कोयना धरण परिसर, नवजा, महाबळेश्वर तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
शासकीय आकडेवारीनुसार ७ जुलै रोजी सकाळपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधाऱ्यातून सुमारे ७७,१२५ क्युसेक पाणी कर्नाटकात वाहून जात असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये सांगली येथील आयर्विन पूल परिसरातून २५,१६४ क्युसेक, आयर्विन पूल व अंकली येथील एकत्रित प्रवाह ४८,५२० क्युसेक तर नरसोबाची वाडी येथे पंचगंगा नदीतून ३६ हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राजापूर बंधाऱ्याच्या उजव्या बाजूने सुमारे ६,७६७ क्युसेक पाणी थेट कर्नाटकात जात असून त्याची स्वतंत्र नोंद होत नसल्याने प्रत्यक्ष वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या उपलब्ध असलेले अतिरिक्त पाणी ताकारी, म्हैशाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांद्वारे उचलून खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, मिरज पूर्व भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तलाव तातडीने भरावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
याशिवाय कर्नाटक सरकारने हिप्परगी बॅरेजमधून पाणी पूर्ण क्षमतेने आलमट्टी धरणाकडे सोडण्याबाबत शासनाने आवश्यक निर्देश द्यावेत. अन्यथा शिरोळ तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही राजोबा यांनी दिला.
निवेदनातील मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सूर्यकांत मोरे, विश्वास कोळी, संजय बेले, धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, श्रेयांश पाटील, रोहित पाटील, प्रमोद गोंडाजी, योगेश पाटील, श्रेणी खवाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.