
गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
यावेळी राजू शेट्टी यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन बाळासाहेब पाटील यांना सादर केले. यात प्रमुख मागण्या अशा आहेत -15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाल्यास ऊसातील रिकव्हरी घटून शेतकरी आणि कारखाने दोघांचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 500 रुपये अनुदान द्यावे. साखरेचा किमान हमीभाव (MSP) प्रति किलो 50 रुपये करावा आणि सी-हेवी इथेनॉलचा विक्री दर प्रतिलिटर 70 रुपये निश्चित करावा. इथेनॉल उत्पादनावर बंदी आल्याने कारखान्यांच्या प्रकल्पावरील कर्जाच्या हप्त्याचा व व्याजाचा बोजा वाढणार असल्याने संपूर्ण वर्षभरासाठी व्याज सवलत आणि हप्त्याला मुदतवाढ देणारी योजना जाहीर करावी.
बाळासाहेब पाटील यांनी राजू शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड उत्तर तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शासनाने साखर कारखाने 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत बाळासाहेब पाटील यांनीही यापूर्वी व्यक्त केले आहे. 15 नोव्हेंबर ते 15 मार्च दरम्यानच साखर परिपक्व होते, असे त्यांचे म्हणणे आहे.