संग्रहित फोटो
हृदयाच्या आरोग्याची काळजी घेताना बहुतांश व्यक्ती कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण, कोलेस्ट्रॉल पातळी नॉर्मल असल्याचा रिपोर्ट आला म्हणजे सर्व काही ठीक आहे असे नाही. रक्तदाब, रक्तातील साखर, कौटुंबिक इतिहास, झोप, जळजळ आणि इतर चयापचय घटक यांमुळे देखील हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. भारतातील एकंदरीत परिस्थिती चिंताजनक आहे. आयसीएमआर-इंडियाब (ICMR-INDIAB) च्या संशोधनानुसार, तपासणी केलेल्या प्रौढांपैकी ११.४ टक्के व्यक्तींमध्ये मधुमेह, १५.३ टक्के व्यक्तींमध्ये प्री-डायबिटीज, ३५.५ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि ८१.२ टक्के व्यक्तींमध्ये डिस्लिपिडेमिया आढळून आला. या आकडेवारीवरून निदर्शनास येते की, हृदयाच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे डायरेक्टर अँड सीनियर कन्सल्टंट डॉ. राजीव सेठी म्हणाले, “हृदयाचे आरोग्यावर कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त इतर अनेक घटकांचा देखील परिणाम होतो. कौटुंबिक इतिहास, रक्तदाब, रक्तातील साखर, झोप, शरीरातील जळजळ आणि इतर चयापचय घटक यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, ज्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.”
कौटुंबिक इतिहास महत्त्वाचा
आई-वडिलांना किंवा भावंडांना कमी वयात हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक आला असेल, तर त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी अहवाल नॉर्मल आले तरी कौटुंबिक इतिहासामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जनुकीय रचना देखील लाइपोप्रोटीन(ए) म्हणजेच एलपी(ए) च्या प्रमाणावर परिणाम करू शकते. हा कोलेस्ट्रॉलशी संबंधित घटकांचा प्रकार आहे, जो प्रामुख्याने अनुवंशिक असतो आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. जीवनशैलीशी संबंधित इतर घटकांपेक्षा वेगळे म्हणजे, आहार किंवा व्यायामाने एलपी(ए)च्या प्रमाणात मोठा बदल होत नाही. हृदयविकाराचा तीव्र कौटुंबिक इतिहास असलेल्या किंवा हृदयविकाराचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींनी ही चाचणी करणे आवश्यक आहे.
स्पष्ट लक्षणे न दिसताही हृदयविकार उद्भवू शकतो
लक्षणे दिसण्याच्या खूप आधीपासूनच धमन्यांमध्ये प्लाक साचू लागत असल्याने अनेकदा हृदयविकार हळूहळू वाढत जातो. अधिक तपासणीची गरज असल्यास, डॉक्टर काही विशेष इमेजिंग चाचण्यांचा वापर करू शकतात. यामध्ये कॅल्शियमयुक्त प्लाक शोधण्यासाठी कोरोनरी आर्टरी कॅल्शियम (सीएसी) स्कोरिंग किंवा धमन्यांमधील अरुंदपणा पाहण्यासाठी सीटी कोरोनरी अँजिओग्राफी (सीसीटीए) यांसारख्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात. पण, या चाचण्या प्रत्येकासाठी सरसकट वापरण्याजोग्या नसल्यामुळे डॉक्टर रुग्णाचे वय, धोक्याचे घटक, लक्षणे आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार त्यांचा सल्ला देतात.
रक्तदाब आणि रक्तातील साखरेकडे लक्ष देणे गरजेचे
रक्तदाब, रक्तातील साखर आणि ट्रायग्लीसराईड्स यांसारखे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित प्रमुख घटक कोणतीही लक्षणे न दाखवता बिघडू शकतात. उच्च रक्तदाबाची समस्या तर अत्यंत लुप्त असते. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतात २२० दशलक्ष व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पण त्यापैकी केवळ जवळपास १२ टक्के व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच, रक्तातील साखर मधुमेहाच्या पातळीपर्यंत पोहोचण्याआधी हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. त्यामुळे इतर घटकांबरोबरच फास्टिंग ग्लुकोज आणि HbA1c यांसारख्या नियमित चाचण्या केल्यास लवकर निदान मिळू शकते.
झोप, ताणतणाव आणि जळजळ यांचा हृदयावर परिणाम
आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक दुर्लक्षित घटकांचा हृदयाच्या आरोग्यावर मुख्यत्वे परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, चयापचयाशी संबंधित समस्या, लठ्ठपणा आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता असते, म्हणून नियमितपणे पुरेशी झोप घ्या. दीर्घकालीन दाहामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि ॲथेरोस्क्लेरोसिस, म्हणजेच धमन्यांमध्ये प्लाक साचण्याची प्रक्रिया वेगाने होते. तसेच, शहरातील हवेचे प्रदूषण आणि सूक्ष्म धुलीकणांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे हृदय आणि चयापचयाशी संबंधित धोके वाढतात, त्यामुळे बाहेरील प्रदूषणापासून संपर्क टाळल्यास हृदयाचे रक्षण होण्यास मदत होते.
रिपोर्ट “नॉर्मल” आला म्हणून हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
हृदयाच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी ही केवळ कोलेस्ट्रॉलपुरती मर्यादित नसते. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, कमरेचा घेर, धूम्रपानाची सवय, झोपेच्या सवयी, कौटुंबिक इतिहास आणि पूर्वीपासून असलेले आजार या मुख्य घटकांचे मूल्यमापन केले जाते. रुग्णाच्या वैयक्तिक धोक्याची पातळी पाहून, डॉक्टर नेहमीच्या स्क्रिनिंगऐवजी सखोल वैद्यकीय निदानासाठी एलपी(ए), एपीओबी, सीएसी स्कोरिंग किंवा सीटी कोरोनरी अँजिओग्राफी (सीसीटीए) यांसारख्या विशिष्ट चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. एकाच घटकावर विसंबून न राहता हृदयविकाराच्या सर्वंकष धोक्याचे मूल्यमापन केल्यास वेळेत निदान आणि योग्य उपचार शक्य होतात.






