
कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन; वांगचुक यांच्या आंदोलनाला शेकाप, रासपसह बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा
कराड : ज्येष्ठ संशोधक व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कराड येथील कोल्हापूर नाका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शेतकरी हिताच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. समीर देसाई यांनी सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले. त्यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतमालाला हमीभाव, वाढते इंधनदर आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. देसाई यांनी वांगचुक यांच्या संशोधन कार्याचा उल्लेख करत लडाखमधील प्रतिकूल हवामानात लष्करासाठी कमी खर्चातील टिकाऊ तंबू विकसित करण्यासह त्यांनी देशासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचे नमूद केले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बळीराजा शेतकरी संघटनेचे चंद्रकांत यादव यांनी स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणून अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, तसेच सरकारने वांगचुक यांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
डेळेवाडी-गमेवाडी मार्गावर संशयास्पद रसायनाचे तीन टँकर जप्त; आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे कारवाई
या आंदोलनात प्रल्हाद माने, संदीप तिकवडे, भाई हैबतराव पवार, आनंदराव (चेअरमन) थोरात, हुबाळे, जगताप यांच्यासह शे.का.प., रासप आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी काही काळ वाहतूक रोखून विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.
आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा ! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर