अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; जगबुडी नदीत मोटार कोसळली, पाच जणांचा मृत्यू
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भरणे जगबुडी पुलावरून नदी पात्रात मोटार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबईतील मिरा रोड येथून मिताली मोरे ही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांसह माहेरी जात होती. देवरुख येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेडजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. मोटारीतून विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत भाचा, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर हे प्रवास करत होते. त्यांच्या पैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे असे समजते.
कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबायचं काही नाव घेत नाही. अशातच आता घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी देखील या महामार्गावर मोठ्य़ा प्रमाणात अपघात झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील चौपदीकरण होऊन बराच अवधी लोटला मात्र परशुराम घाट परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा वेग अद्यापही मंदावलेला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेवर प्रवाशांनी कायमच नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कायमच ताशेरे ओढले आहेत. परशुराम घाट आणि आजूबाजूचा परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिजे तसं बांधकाम झालेलं नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक आणि प्रवाशांनी व्यक्त केली आहे.