छत्रपती कारखाना निवडणुकीसाठी ७४.७४ टक्के मतदान
बारामती: भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि १८) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीमध्ये ७४.७४ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ४५ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली असून सोमवारी (दि १९) मतमोजणी होणार असून या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत निवडणुकीचा कल लक्षात येणार आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीसाठी अ वर्गातून २२ हजार ७८२ तर ब वर्गातून ३२४ असे एकूण २३,१०६ एकूण मतदार आहेत, यापैकी ७४.७४ टक्के मतदान झाले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ७६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी आठ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघासाठी मतदान केले. यानंतर खताळपट्टा या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार , आई आशाबाई पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता पॅनल विरुद्ध कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, भाजप किसान मोर्चाचे नेते तानाजीराव थोरात, अविनाश मोटे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती बचाव पॅनेल अशी चुरशीची लढत झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या दोन दिवसांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रात प्रचार सभा घेऊन अनेक नाराजांना समजूत काढून त्यांना आपल्या बाजूने सक्रिय केले. कारखाना कार्यक्षेत्रातील ७६ मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रिया बारामती शहरातील प्रशासकीय भवन मध्ये सुरू होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.