
चिपळूण नगर परिषदेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू
राजकीय पक्षांकडून नगरसेवकपदासाठी जोरदार दावे सुरू
गेल्या काही दिवसांपासून दिसून येतोय राजकीय शिमगा
चिपळूण: गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषद निवडणुकांसाठी सर्वांची उत्कंठा लागून राहिली होती. ती उत्कंठा अखेर मंगळवारी संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून तत्पूर्वी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी जोरदारपणे सुरू होती. महायुती व महाविकास आघाडी पक्षांकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी जोरदारपणे दावे सुरू आहेत. आता महायुती महाविकास आघाडी होणार की स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासह २८ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय शिमगा
महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत असल्या तरी प्रत्येक पक्षातील इच्छुक स्वतंत्रपणे काम करत आहेत. महाविकास आघाडीतही काहीशी अशीच स्थिती आहे. प्रत्येक पक्षात जागांच्या दुप्पट इच्छुक असल्याने महायुती किंवा महाविकास आघाडी झाल्यानंतर त्यांना सामावून कसे घेणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे बंडखोरीचीही भीती आहे. महायुतीतील ३ आणि आघाडीतील ३ अशा ६ ही पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळेच येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय शिमगा सुरू झाला आहे.
Chiplun: महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई; ज्वलंत प्रश्नावर राजकारण!
१० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन दाखल
सर्वसाधारण महिलांसाठी ९ जागा, सर्वसाधारणसाठी १० आणि अनुसूचित जाती महिलांसाठी १ जागा जाहीर करण्यात आली. चिपळूण नगर परिषदेत साठी प्रभागांची संख्या १४ तर सदस्य संख्या २८ अशी असून स्त्री मतदार २१ हजार ५९६ तर पुरुष मतदार २० हजार ९८६ असे एकूण ४२ हजार ५८२ मतदार निश्चित झाले आहेत. दिनांक १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख असून या कालावधीत किती उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार प्रभाग रचना
आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार नवीन प्रभाग रचना केली आहे, त्यह्यमाणे एका नवीन प्रभागाची वाढ झाल्याने आता शहरात १३ ऐवजी १४ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे २६ ऐवजी २८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच यापूर्वी स्वीकृत स्वरूपात दोन नगरसेवक निवडले जात होते, आता ती संख्या तीन झाली आहे. नपच्या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ जागा निश्चित केल्या, यातील ४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.