(फोटो- टीम नवराष्ट्र)
सर्वांचा लाडका सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन येत्या ७ तारखेला म्हणजेच शनिवारी होणार आहे. बाजारपेठ सजल्या आहेत. लोक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच गणपती मंडळे देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. मंडपाची सजावट, देखावे आणि अन्य गोष्टींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. तयारी अंतिम टप्यात आलेली आहे. मात्र या सणासुदीच्या काळात कुठेही दारू पिऊन लोकांनी धिंगाणा करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दारूबंदीचे आदेश काढले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात ७ सप्टेंबर म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दारूबंदीचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गणेशोत्सवाच्या काळात ३ दिवस मद्यविक्रीवर बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार ७ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आणि १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात दारूबंदी असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ७,१२ आणि १७ तारखेला देशी-विदेशी मद्य, ताडी-माडी विक्री केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी काढले आहेत. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम कलम १४२ अन्व्यये हे आदेश जारी केले आहेत. तसेच संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामध्ये कसूर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.