डेरवण मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रशासनाचा मनमानी कारभार
चिपळूण/ संतोष सावर्डेकर :–तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयाजवळच्या डेरवण मुख्य रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. डेरवण रुग्णालयाबरोबरच क्रीडा संकुल आणि वैद्यकीय महाविद्यालयात येणारे बिनधास्तपणे आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करून निघून जात असल्याने वाहतुकीच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे सबंधित यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सावर्डे हे गाव दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. डेरवण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दोन मोठी वाहने काठोकाठ जातील एवढीच जागा रहात आहे. वालावलकर रुग्णालय व इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच परिसरातील आजूबाजूच्या गावांमधून जाणाऱ्या सुमारे पंधरा गावांचा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. या रस्त्यावरील रुग्णालय तसेच क्रीडासंकूल, इंग्लिश मिडीयम स्कूल व महाविद्यालय येथील परिसर विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, सावर्डे डेरवण मुख्य रस्ता अशा दुतर्फा वाहन पार्किंगने व्यापत असल्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा-Chiplun हायटेक बसस्थानक बांधकाम लांबणीवर ; प्रवाशांनी व्यक्त केला संताप
या रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा सध्या अडचणीचा विषय बनला आहे. रुग्णालय व शैक्षणिक, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे विविध आरोग्य विषयक व खेळासंबंधीत शिबीर हे नेहमी होतच असतात. परंतु सदर शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी असणारी वाहतूक विद्यार्थ्यांसाठी धोकादायक सावर्डे परिसरात एरव्ही वाहतुकीच्या नावाखाली कारवाया नित्य होत असतात.मात्र, डेरवण रस्त्यावर अपघाताला आमंत्रण देणाऱ्या दुतर्फा वाहनांच्या अडथळ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे. या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात असल्याची चिंता देखील पालकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-Chiplun : दुचाकी अपघाताला महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार; स्थानिक नागरिकांचा आरोप
आजुबाजूच्या इतर गावांमधून होणारी वाहतूक ही या एकाच रस्त्यावर जास्त आहे. त्याशिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने ती वाहने या मार्गावर दुतर्फा लावून वाहन मालक चालक बिनधास्त असतात. वाहतूक नियंत्रण यंत्रणा याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांना केला आहे. तसेच लहान मुलांना शाळेतून ने-आण करणाऱ्या महिलांना वाहन चालवण्यासाठी करावी लागणारी कसरत अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे, तरी सबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडू केली जात आहे.