भटक्या कुत्र्यांचा त्रास (फोटो- सोशल मिडिया)
अलिकडेच फगरवठार पोलिस लाइनजवळ खेळणाऱ्या एका निष्पाप छोट्या बालकावर तब्बल ७ ते ८ श्वानांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. या श्वानांनी त्या बालकाला ओढत झाडीत नेले, परंतु सुदैवाने काही जागरूक नागरिकांच्या हे लक्षात आल्याने त्या बालकाचा जीव वाचू शकला. या गंभीर घटनेनंतर शिवसेना (उद्धव – बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी – जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता ‘ही’ मोठी कारवाई
या सर्व गंभीर प्रकारावर बोलताना प्रसाद सावंत यांनी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनावर अत्यंत जोरदार व थेट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. नगर परिषद केवळ कर वसुली करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण नक्की कधी व किती वर्षांपूर्वी झाले होते, याची आकडेवारी प्रशासनाने जनतेसमोर जाहीर करावी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जर नगर परिषदेने येत्या काही दिवसांत ठोस कारवाई केली नाही व यापुढे कुणाचा जीव गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी व प्रशासनाची राहील. अशा स्थितीत थेट पोलिस ठाण्यात जाऊन नगर परिषद प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा कडक इशारा त्यांनी दिला. भटक्या श्वानांच्या समस्येसोबतच शहरात रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरेसुद्धा नागरिकांसाठी एक मोठी व त्रासदायक डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Latur crime: लातूरमध्ये मोकाट श्वानांचा धुमाकूळ; दोन चिमुकल्यांनंतर युवकाचाही मृत्यू
या मोकाट जनावरांचा व भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करून रत्नागिरीतील नागरिकांना सुरक्षित वातावरणात मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. रत्नागिरीतील नागरिक नियमितपणे नगर परिषदेला कर भरत आहेत, त्यामुळे त्यांना मूलभूत सुरक्षा व सोयी-सुविधा पुरवणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. जर प्रशासनाने या संदर्भात तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात याविरोधात तीव्र व आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नगर परिषदेने यावर वेळीच गांभीयनि विचार करून शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा.






