चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; नगरपरिषदेने केली आता 'ही' मोठी कारवाई (संग्रहित फोटो)
चाकण : चाकण येथील आंबेठाण पुलाजवळ रविवारी (दि. १६) मध्यरात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर चाकण नगरपरिषदेने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर नगरपरिषदेच्या जलद कृती दलाने आंबेठाण पूल व मार्केट यार्ड परिसरात शोधमोहीम राबवून हल्ला करणारी भटकी कुत्री पकडली आहेत.
नगरपरिषदेच्या भटक्या कुत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रात पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय तपासणी व उपचार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. चाकण शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या वतीने कुत्रे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सन २०२५ पासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २१४ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले.
जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत ३०४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. सध्या ABC केंद्रात आणखी ३५ भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण व लसीकरणाची प्रक्रिया सुरू असून शहरातील विविध भागांत भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू आहे.
भटक्या कुत्र्यांची माहिती मिळताच प्रशासनाकडून कारवाई
पिसाळलेल्या किंवा आक्रमक भटक्या कुत्र्यांची माहिती मिळताच जलद कृतीदल तात्काळ घटनास्थळी पोहोचून जाळीच्या साहाय्याने कुत्र्यांना पकडून सुरक्षितपणे निवारा केंद्रात हलवत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला उघड्यावर कचरा टाकू नये, असे आवाहनही नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
भटकी कुत्रे दिसताच आरोग्य विभागाशी साधा संपर्क
तसेच पिसाळलेल्या किंवा आक्रमक भटक्या कुत्र्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8956128484, 7385301341, 9604877721, 9594532581 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चाकण नगरपरिषद प्रशासन सदैव तत्पर राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
10-12 कुत्र्यांचा महिलेवर हल्ला
चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला चढवून तिचा जागीच जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : ‘बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवायला गेले अन् थेट…’; राजापूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार






