
Cyber Crime
पोलिस, बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे द्यावेत. अशा सूचना त्यांनी दिल्या. सायबर गुन्हेगारांविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या मोहिमेचे लोकचळवळीत रूपांतर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा प्रशासनातील आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध बँकांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर भामट्यांच्या अत्यंत क्लिष्ट आणि हायटेक कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. नुकत्याच घडलेल्या एका गुन्ह्यात भामट्यांनी ८७ लाख रुपयांची रक्कम अवघ्या दोन मिनिटांत १४०० विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे समोर आले. मुंबई आणि तामिळनाडूमधील खात्यांचा वापर करून अत्यंत चाणाक्षपणे हा पैशांचा अपहार करण्यात आला होता.
तंत्रज्ञानाचा असा गैरवापर रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सतर्कता हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. गुन्हेगारांच्या नवीन क्लृप्त्यांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत पातळीवर थेट संवाद साधून जनजागृती करण्यावर प्रशासनाने विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर गुन्हेगारीविरुद्धची ही लढाई आता केवळ पोलीस यंत्रणेपुरती मयादित न राहता प्रशासकीय सहकायनि पुढे नेली जाणार आहे. बँकेतून गोपनीय माहिती लीक होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने बँकांना दिले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी मागितलेली तांत्रिक माहिती बँकांनी तत्काळ उपलब्ध करून दिल्यास गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, डिजिटल युगात पैशांची सुरक्षा हीच सर्वांत मोठी प्राथमिकता असल्याने नागरिकांनी अनोळखी फोन किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास त्वरीत्त सायबर पोलिसांशी किंवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महाजनजागृती मोहिमेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सायबर सुरक्षेचे कवच मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला.