
सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद म्हस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, YCISचे प्राचार्य डॉ. सुभाष साळुंखे उपस्थित होते.
Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
सृष्टीने १ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. संस्थेच्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्याबाबत कौटुंबिक तणावासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीची माहिती पालकांपर्यंत पोहोचल्याने सृष्टी नाराज होती आणि त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती संस्थेकडून देण्यात आली. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलिस तपास तसेच चौकशी समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे डॉ. म्हस्के यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही दोषारोप करणे अथवा कोणाला निर्दोष ठरविणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थेने घेतली आहे.
घटनेनंतर वसतिगृहातील सुरक्षाव्यवस्थेचा संस्थेने फेरआढावा सुरू केला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय वसतिगृहातील अन्य सुरक्षा व्यवस्थांमध्येही आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत.
सृष्टीच्या मृत्यूनंतर विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी जबाबदारी निश्चित करण्याची, संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच सृष्टीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या मागण्यांची संस्थेने गांभीर्याने दखल घेतली असून, चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार आणि संस्थेच्या नियमांनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. चौकशीत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही संस्थेने दिला आहे.