
Maharashtra Municipal Election 2026:
सत्ता मिळवण्यासाठी मित्रपक्षांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे ‘तोडफोडीचे राजकारण’ शिगेला पोहोचले आहे. मुंबईत सर्वात मोठे नाराजीनाट्य हे मातोश्रीच्या अंगणातच घडल्याचे पाहायला मिळाले. मातोश्री ज्या वॉर्डमध्ये येते, त्या वॉर्ड क्रमांक ९५ मध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारत त्यांच्याऐवजी हरिश शास्त्री यांना उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे नाराज असलेल्या वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण यानंतर वॉर्ड क्रमांक ९५ मधील उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली. राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक १५ जानेवारी रोजी, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Municipal Elecction 2025)
इच्छुक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकत्यांनी एबी फॉर्म मिळण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. या प्रकारामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घडामोडींवर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत झालेला प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.
ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?
ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यानी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरनाईक हे यापूर्वी महापालिकेत नगरसेवक होते. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलांना तिकीट मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न केले. पण, पूर्वेश सरनाईक यांनी त्याची जागा कार्यकत्यांसाठी सोडली आहे. यंदा प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाजीगनगरात शिवसेना भाजप युती तुटल्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युती व्हावी यासाठी आम्ही वारंवार बैठक घेण्याचा प्रयत्न केला. बैठकीत युतीबाबत सर्व ठरले. मात्र, आलेला प्रस्ताव शिवसेनेत संभ्रम निर्माण करणारा होता. बैठकीत जे ठरलं ते बदललं. आमची ताकद वाढल्याचं दिसल्यामुळे त्यांनी युती तोडली. त्यांच्याकडून संदेश आले नाहीत. (BJP Politics)
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यानंतर भाजपने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी देणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा पक्ष कार्यालयाला घेराव घातला. तिकिट वाटपात निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप कार्यकत्यांनी केला. धक्कादायक म्हणजे एका कार्यकत्याने यावेळी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या अनेक इच्छुकांनी घेराव घालत मोठा राडा केला. यावेळी निष्ठावंत कार्यकत्यांना डावलून आयारामांना तिकीट दिल्याचा आरोप भाजप कार्यकत्यांनी केला. तसेच अनेक महिला उमेदवारांनी आक्रोश करत आपला राग व्यक्त केला. तर प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनीही उमेदवारी डावलल्याने थेट आंदोलन सुरू केले.
नागपूरमध्ये भाजपने महायुतीमध्ये सन्मानजनक जागा न दिल्याने स्वबळावर लढण्याची तयारी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही कार्यकर्त्याच्या नाराजीचा फटका बसला, प्रभाग क्रमांक ५ मधून अविनाश पारडीकर या कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली होती. त्याने आज दुपारी गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात सर्वच पदाधिकाऱ्याऱ्यांची भेट घेतली. परंतु त्याला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या अविनाश पारडीकरने कार्यालयातील टीव्ही व काचाच्या कॅबिनची तोडफोड केली, एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कार्यालयाबाहेरच पदाधिकाऱ्यांनी तिकिटे विकल्याचा आरोपही केला. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली.