वडीलांवर अजित पवारांनी केलेल्या टीकेवर रोहित पाटील यांचे प्रत्युत्तर (फोटो - सोशल मीडिया)
सांगली : राजकीय नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. बंडखोरी नंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे नेत्यांच्या टीका वाढल्या आहेत. आता अजित पवार यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्यावर आरोप केला होता. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अजित पवार यांना यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या टीकेवर रोहित पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी तासगाव येथून संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रचारावेळी अजित पवारांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला असे म्हणत धक्कादायक टीका केली. यावरुन रोहित पाटील यांनी उत्तर दिले. एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले की, “अजितदादा वयानं मोठे आहेत, एकेकाळी त्यांनी नेतृत्व केलं आहे, आम्ही देखील त्यांचं नेतृत्व स्वीकारत काम केलं आहे. आबांच्या पश्चात त्यांचं मार्गदर्शन होत असे. पक्षफुटीनंतर आदरणीय पवार साहेबांचं आबांच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेता आबा असते तर पवार साहेबांसोबत उभे राहिले असते. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबत ताकदीनं उभे राहण्याची भूमिका घेतली. आजचं दादांचं स्टेटमेंट मी ऐकलं. माझे वडील जाऊन नऊ-साडे नऊ वर्ष झालेली आहेत. नऊ साडे नऊ वर्षानंतर ही मळमळ बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं आहे,” असे म्हणत रोहित पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे रोहित पाटील म्हणाले की, “त्या काळी काय घडलं याची उत्तरं आबा गेल्यानंतर आम्ही देऊ शकत नाही. त्यावेळी काय घडामोडी असतील, काय घडलं असेल त्याची उत्तरं आबा हयात नसताना देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते. आबा गेल्यानंतर साडे नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर याचे दु:ख आहे. इथले उमेदवार जे आहेत त्यांची परिस्थिती मतदारसंघात चांगली नसल्यानं अजित पवार यांना तसं वक्तव्य करावं लागत आहे,” असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त करत वडिलांवर केलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
तासगावमधील संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार म्हणाले की, “सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे फाईल गेली. त्यावेळी आर. आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करण्याचे आदेश देत फाईल सही केली. पण त्यानंतर सरकार गेलं, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण राज्यपालांनी माझ्या त्या फाईलवर सही केली नाही. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर कारवाई करण्यासाठी फाईलवर सही केली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमच्या चौकशीसाठी आदेश दिले, आणि फाईलवर सही केल्याचे दाखवले. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, सहकार्य केलं. त्याच आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता,” असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.