सौजन्य - नवराष्ट्र टीम
तासगाव/प्रवीण शिंदे : तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. हातातोंडाशी आलेला हंगाम पाण्याखाली गेला आहे, अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत अधिक खोल गेले, तर काहींच्या डोळ्यासमोर वर्षभराची मेहनत पाण्यात वाहून गेली. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे.
शेतकरी हवालदिल, शासन मात्र मौन
तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. खरीप पिकांची अवस्था बिकट असून, शेतकऱ्यांवर जगण्याचे संकट ओढवले आहे. अशा वेळी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, आजवर केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच घडलेले नाही. शासन यंत्रणा पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे, तर मदतीचा प्रश्न अजूनही हवेतच आहे.
उपोषणातील ठोस मागण्या
आमदार पाटील यांनी शासनासमोर काही ठोस मागण्या ठेवत या उपोषणाची दिशा स्पष्ट केली आहे.
तासगाव तहसीलसमोर होणारे हे उपोषण हा केवळ एक राजकीय उपक्रम नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शासनाने जर अजूनही दुर्लक्ष केले, तर शेतकऱ्यांच्या असंतोषाची ठिणगी मोठ्या आंदोलनात परिवर्तित होईल, यात शंका नाही.






