वाल्मीक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळच असल्याचे आरोप होत आहेत. मात्र आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात ईडीने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्त्याने या प्रकरणात ईडीने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत याबद्दलची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे सातत्याने नाव समोर येत असल्याने पोलिसांच्या तपासाला मर्यादा येत असल्याचे या याचिकेत सांगण्यात आले आहे. बीड प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहेत. मात्र ईडीने देखील स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचा: Suresh Dhas: “करूणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल…”; सुरेश धसांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. वाल्मीक कराडविरोधात ईडीने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मंत्र्यांशी सबंधित कंपन्या आणि मालमत्ता समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाला देखील प्रतिवादी करावे अशी मागणी केली गेली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे. सुनावणी झाल्यास हायकोर्ट काय निर्णय देते हे पहावे लागणार आहे.
तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा नवा प्रताप समोर
बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातच आता वाल्मीक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा संवाद ऐकायला मिळतो. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या संभाषणात कराडने “मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर काय चिंता” असे विधान केले आहे. या क्लिपमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात आहे. सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे यांच्याशी कराडचा संवाद असल्याचे क्लिपमध्ये ऐकायला मिळते. या संभाषणात, एका कार्यकर्त्याच्या प्रकरणावरून वाल्मिक कराडने हस्तक्षेप करत, “किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून” असे सांगितल्याचे आढळते.