पुणे : नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. अशातच आज भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे.
लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया ठोंबरे यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा देखील निषेध केला आहे. आंदोलन केली आहेत. तरीदेखील प्रसाद लाड यांनी आज हे वक्तव्य करण्याची हिम्मत केली आहे. यांना शिक्षा एकच आहे ती म्हणजे यांची जीभ छाटली पाहिजे.” असंही त्या म्हणाल्या.
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेल्याचे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे. उठसूट वादग्रस्त वक्तव्य होत असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.