Radhakrishna Vikhe Patil reaction on Manoj Jarange Patil Maratha protest in Mumbai azad maidan
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मराठा समाजाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे. मराठा समाजाची आजची मागणी नाही. त्या-त्या वेळी तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं पण मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना हे आरक्षण गमावलं’, असे ते म्हणाले.
तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. आम्हाला प्रत्येकाला मराठा असल्याचा स्वाभिमान आहे आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी आहे. पण मला वाटतं की, गुणरत्न सदावर्तेसारखं या कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे.