Sangli Teacher Bank 74th Annual Meeting
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही दीर्घकाळापासून कार्यरत सहकारी बँक असून तिचे प्रधान कार्यालय सांगलीत आहे. १३ डिसेंबर २०२५ रोजी स्वाभिमानी मंडळाने बँकेचा कारभार हाती घेतला. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ पाच महिन्यांचा कालावधी मिळाला. तरी काटकसरीचे धोरण स्वीकारून सभासदांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतल्याचे घागरे यांनी सांगितले.
घागरे म्हणाले, “मागील कारभाऱ्यांनी २.६६ टक्क्यांच्या आसपास लाभांश दिला होता. आमच्याकडे केवळ पाच महिन्यांचा कालावधी असतानाही काटकसरीने कारभार करून ५ टक्के लाभांश देत आहोत. यापूर्वी २०२० मध्ये शून्य टक्के लाभांश देण्याचीही वेळ आली होती. सभासदांच्या पैशाचा योग्य वापर करून त्यांना जास्तीत जास्त फायदा देणे ही आमची भूमिका आहे.” यापूर्वी बांधकामासाठी करण्यात आलेले काही ठेके चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा करत ते रद्द करण्यात आल्याचेही घागरे यांनी सांगितले.
बँकेने नियमित कर्जाची मर्यादा १६ लाखांवरून २० लाख रुपये केली असून त्यासाठी ९.७५ टक्के व्याजदर असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण सेवकांना कायम सभासदत्व देऊन त्यांच्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आकस्मिक कर्जाची मर्यादाही तीन लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली.
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सभासदांसाठी असलेला दुजाभाव दूर करून दोन्हीकडील सभासदांना समान ५५ लाख रुपयांची एकूण कर्जमर्यादा लागू करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष कृष्णा पोळ म्हणाले, “बँकेवरील ठेवीदारांचा विश्वास वाढला असून ठेवींनी ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सभासदांची मासिक कपात १३०० रुपयांवरून एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाची दरमहा ३०० रुपयांची कपात कमी होणार आहे.” सर्व सभासदांनी वार्षिक सभेला उपस्थित राहावे; मात्र सभा शांततेत आणि शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा कायम राखून पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोळ यांनी केले.
जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले, “‘मृतसंजीवनी’ योजनेच्या मासिक कपातीत वाढ न करता मृत सभासदांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीत वाढ केली आहे. जुन्या पेन्शन योजनेतील सभासदांच्या वारसांना मिळणारी मदत ७ लाखांवरून १२ लाख रुपये, तर एनपीएसधारक सभासदांच्या कुटुंबीयांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.”
एमपीएससीधारक शिक्षकांसाठी अतिरिक्त मदतीची तरतूद करण्यात आली असून विविध स्वरूपात आतापर्यंत सुमारे २ कोटी ५७ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कर्ज असलेल्या तसेच कर्ज नसलेल्या मृत सभासदांच्या कुटुंबीयांनाही योजनेतून मदत दिल्याचे त्यांनी सांगितले. परजिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या सभासदांकडून यापूर्वी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात होती. आता सर्व सभासदांसाठी कागदपत्रांबाबत समान निकष ठेवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये संगणक घसारा व दुरुस्तीवर सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला होता. चालू वर्षात हा खर्च सुमारे ५८ लाख रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे सुमारे ७२ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा करण्यात आला. आवश्यक डिजिटल बँकिंग व सायबर सुरक्षेवरील खर्च मात्र करण्यात आल्याचे सांगण्यात आले.वसुलीवर विशेष भर दिल्याने थकीत कर्जाची वसुली सुधारली असून एनपीएसाठीची तरतूद शून्यावर आणण्यात यश आल्याचा दावाही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
स्वाभिमानी मंडळाचे नेते अविनाश गुरव यांनी आगामी सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना उद्देशून सांगितले, “सभासदांनी विधायक मार्गाने प्रश्न विचारावेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र सभेत अनुचित प्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही आणि आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.”
वार्षिक सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासह सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील सत्ताधाऱ्यांनी जुन्या शाखांच्या दुरुस्तीवर दोन वर्षांत सुमारे एक कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करत त्या खर्चाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
पाच महिन्यांच्या कारभारात ५ टक्के लाभांश देणे शक्य झाले असून आगामी आर्थिक वर्षात पूर्ण वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने सभासदांना अधिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस चेअरमन अशोक घागरे, व्हाईस चेअरमन कृष्णा पोळ, स्वाभिमानीचे नेते जगन्नाथ कोळपे, अविनाश गुरव, सुधाकर पाटील, तानाजी खोत, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मुश्ताक पटेल, माजी चेअरमन रुपाली गुरव, संजय महिंद, अनिता काटे, फत्तू नदाफ, मिलन नागणे, नितीन चव्हाण, अमोल शिंदे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल माने, सचिन खरमाटे, धनाजी घाडगे, राहुल पाटणे, शिवाजी जाधव, सुनील तावरे, उल्हास सानप, विलास हाके, विश्वास पुजारी, मागासवर्गीय संघटनेचे संतोष काटे, खाजगी शिक्षक परिषदेचे बाळासाहेब कटारे, नितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.






