सौजन्य फोटो - नवराष्ट्र टिम
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार महिला रिअल इस्टेट एजंट असून त्या रिअल इस्टेट एजंट वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका महिलेला भाडेतत्त्वावर फ्लॅट दिला होता. हा व्यवहार करताना नियमानुसार भाडेकरार करण्यात आला होता. तसेच संबंधित भाडेकरू महिलेबाबत पोलिसांकडून आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आले होते. त्यामुळे संबंधित व्यवहार कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्ण करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही दिवसांनंतर काशीमीरा पोलिसांनी संबंधित भाडेकरू महिलेला अटक केली. पोलीस तपासादरम्यान ती महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना फ्लॅट भाड्याने देणाऱ्या महिला रिअल इस्टेट एजंटलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची भीती पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांनी दाखवल्याचा आरोप आहे.
गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी तसेच या प्रकरणातून नाव वगळण्यासाठी खाडे यांनी तक्रारदार महिलेकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, भाडेकरार आणि पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र अशा आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही आपल्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याने तक्रारदार महिलेने या प्रकाराला विरोध केला. अखेर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत पोलीस उपनिरीक्षकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बुधवारी तक्रारदार महिलेकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर खाडे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकीकडे पोलीस प्रशासनाकडून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्याकडूनच लाचेची मागणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फ्लॅट भाड्याने दिलेल्या महिला एजंटला गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाच मागितल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Ans: काशीमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
Ans: बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालेल्या महिलेला फ्लॅट भाड्याने दिल्याच्या प्रकरणात महिला रिअल इस्टेट एजंटला गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी आणि नाव वगळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
Ans: तक्रार पडताळणीनंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.






