
Satara Doctor Death Case accused Sub-Inspector Gopal Badne dismissed from police department
Satara Doctor Death Case: सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
फलटण येथे डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्यावर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. डॉ महिला आत्महत्या प्रकरणात बदने याच्या नावाचा उल्लेख आल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हातावर सुसाईड नोट
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाल बदने हा जबाबदार आहे त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यांनीही गेल्या चार महिन्यापासून माझा मानसिक छळ केला अशी तक्रार या महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केली होती. गोपाळ बदने हा गेल्या दोन वर्षापासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याआधी बरड पोलीस ठाण्यामध्ये त्याने सेवा बजावली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली होती त्यांचा तपास पारदर्शी नाही अशी फलटणमधील लोकांची भावना झाली होती. या संदर्भात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. त्यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचे प्रचंड पडसाद उमटले. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाची तपासाची कमान आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही अत्यंत कठोर कारवाई मानली जात आहे .