
साताऱ्यात अतिवृष्टीचा हाहा:कार! (Photo Credit- AI)
गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाचा एकूण पाऊस ३५६.३ मिमी इतका झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२५.८ टक्के असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हेळवाक येथे सर्वाधिक १७६.८ मिमी, आवर्डे येथे १०६.५ मिमी, तर पाटण आणि येराड येथे प्रत्येकी ९८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मोरणा मध्यम प्रकल्प ७२.७३ टक्के भरला असून सांडव्यावरून ३,८११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातून सुरू असलेला विसर्ग गुरुवारी पहाटे बंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वर, जावली, सातारा, वाई आणि पाटण तालुक्यांतील धोकादायक भागांतील नागरिकांना शाळा, अंगणवाडी, मंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पावसामुळे पाटण तालुक्यात १०२, साताऱ्यात २४, जावलीत २०, तर वाई आणि महाबळेश्वरमध्ये प्रत्येकी १३ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे. फलटण तालुक्यात ताथवडे घाटात दगड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जनावरे व सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील अनेक रस्ते व पूल सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील पाबळनाला धबधबा मार्ग, नवजा–हेळवाक रस्ता, मुळगाव येथील कोयना नदीवरील पूल तसेच तारळे–सासपडे–नागठाणे मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन कराड येथे एनडीआरएफचे पथक पूर्वतयारीसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.